महाराष्ट्राची लोककला देशाला भुरळ पाडणारी – केंद्रीय राज्यमंत्री आठवले

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात 'महाराष्ट्र दिन' साजरा नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द असून संपूर्ण देशाला या लोककलेने भुरळ घातली आहे

‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
मागेल त्याला शेततळे योजनेची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भिलारसारखे पुस्तकाचे गाव नवी मुंबई परिसरात व्हावे – आमदार मंदा म्हात्रे


आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द असून संपूर्ण देशाला या लोककलेने भुरळ घातली आहे असे गौरवोद्गगार केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.

येथील प्रगती मैदानावर ३७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आयोजित ‘महाराष्ट्र दिना’ चे उद्घाटन श्री. आठवले यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय,सहायक निवासी आयुक्त सूमन चंद्रा तसेच, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. आठवले म्हणाले, लावणी, दिंडी नृत्य, कोळी नृत्य आदी महाराष्ट्रातील लोककला या देशाला भुरळ पाडणाऱ्या आहेत. राज्याला नररत्नांप्रमाणेच लोककलेचीही मोठी परंपरा असून ही परंपरा देशाला समृध्द करणारी आहे. महाराष्ट्रातील लोककलेमध्ये राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. आज भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून ही लोककला देश-विदेशात पोहचत असल्याचा अभिमान वाटतो.

महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे दमदार सादरीकरण

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ‘एक माती अनेक नाती’ कार्यक्रमातील गण-गौळण, शेतकरी नृत्य, खान्देशी नृत्य, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या दमदार सादरीकरणाने प्रगती मैदानात उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मन जिंकली.

भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दररोज सायंकाळी ‘हंसध्वनी सभागृह’ येथे व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या दहाव्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला.

मुंबई येथील ‘हृदया आर्ट गृप’ च्या ४० कलाकारांनी ‘एक माती अनेक नाती’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे “उगवला सूर्य नारायण…”,“ऐरणीच्या देवा….” , तसेच, पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारकऱ्यांची दिंडी पाहून उपस्थितानी उभे राहून दिंडीला मानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खान्देशी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडाकपारीत राहणाऱ्या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
‘महान्यूज’ मधील मजकूर आपण ‘महान्यूज’च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0